सेलिब्रेशनपेक्षा संस्कारांचा उत्सव; वाढदिवशी प्रेरणादायी व्याख्यानाचा अनोखा उपक्रम
पिलीव | प्रतिनिधी : विनोद लोखंडे
आजच्या काळात वाढदिवस म्हटला की केक कापणे, फटाक्यांची आतषबाजी, डीजे आणि मोठा खर्च अशीच संकल्पना सर्वसामान्य झाली आहे. मात्र पिलीव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अविनाश तानाजी मदने-पाटील (पप्पू शेठ) यांनी स्वतःचा वाढदिवस एका वेगळ्या आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा करत समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थी, पालक आणि युवकांना सकारात्मक दिशा मिळावी या उद्देशाने त्यांनी मोफत प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी सांगली येथील सुप्रसिद्ध युवा व्याख्याते, लेखक व समाजपरिवर्तनकार प्रा. वसंत हंकारे यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
“काळजाला भिडणारे व्याख्यान” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात शिक्षण, करिअर, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जबाबदारी, व्यसनमुक्ती, पालकांशी संवाद आणि सकारात्मक जीवनमूल्ये अशा विविध विषयांवर उपस्थितांना प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घेतला.
हा प्रेरणादायी कार्यक्रम गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पिलीव येथे सिद्धिविनायक नवरात्र महोत्सव, पिलीव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांना योग्य दिशा देणारे आणि समाजात सकारात्मक विचार रुजविणारे उपक्रम काळाची गरज बनली आहे. अशा वेळी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त समाजप्रबोधनाचा उपक्रम राबवून अविनाश मदने-पाटील यांनी “वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा नव्हे, तर समाजाला काहीतरी देण्याचा दिवस असावा,” हा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत असून, इतर तरुणांनीही अशा सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.