ई.आर. न्यूज मराठी
प्रतिनिधी- तानाजी करचे
बारामती: शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी धडक कारवाई करत बारामती एस.आय.डी.सी. डेपोचे वाहतूक नियंत्रक तथा एस.टी. को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे संचालक अनिल तुकाराम बनकर यांना ₹४ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे बारामतीसह परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने केलेल्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी आरोपीने लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी बारामती एस.टी. स्टँड परिसरात आरोपीने ₹४ लाखांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे. या कारवाईचे नेतृत्व एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केले असून, कारवाईनंतर बारामतीत या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.