सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
पिलीव | प्रतिनिधी – विनोद लोखंडे
पिलीव (ता. माळशिरस) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे सहशिक्षक सत्यवान वाघमारे सर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय, प्रामाणिक व समर्पित कार्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श ज्ञानयोगी शिक्षक पुरस्कार’ तसेच ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
हा सन्मान सोहळा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील, शिक्षक नेते सुभाषराव माने, श्रीराम शिक्षण संकुलाचे प्रकाश पाटील, बी. पी. रोंगे सर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
सत्यवान वाघमारे सर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वाघमारे सरांचा हा सन्मान केवळ वैयक्तिक गौरव नसून पिलीवच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी तसेच माळशिरस तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी घडले असून, शिक्षण क्षेत्रात निष्ठेने कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.
या पुरस्काराबद्दल स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, सुरक्षा समिती, पालक, शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सत्यवान वाघमारे सरांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
“शिक्षकाचा खरा सन्मान हा त्याच्या विद्यार्थ्यांच्या यशात असतो; वाघमारे सरांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्याला मिळालेली अभिमानाची पावती आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.