गुलाबराव पुन्हा बरळले… म्हणे आंदोलनाने सरकारे बदलत नाहीत !
E R News Marathi
राज्यातील सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारविरोधात संघर्ष अधिक तीव्र करण्याचे संकेत दिल्यानंतर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया देत आंदोलनाच्या माध्यमातून सरकार बदलत नसल्याचे म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी सरकारने जनतेसाठी केलेली विकासकामे सांगताना ते म्हणाले . “केवळ आंदोलन छेडल्याने सत्तांतर होत नाही. सरकार टिकते ते विकासाच्या बळावर. जे सरकार लोकांसाठी काम करते, त्यालाच जनतेचा पाठिंबा मिळतो. राज्यात सध्या विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे,” असे ते म्हणाले.
आंदोलनस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भेट न दिल्याबाबत विचारण्यात आले असता, पाटील यांनी सरकारकडून योग्य प्रतिनिधी उपस्थित राहणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. “कोणता नेता गेला किंवा नाही यापेक्षा सरकारच्या वतीने प्रतिनिधींनी आंदोलकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या भावना जाणून घेणे अधिक आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक वाढत असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका सुरू आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.