कोल्हापूरच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर !
E R NEWS MARATHI
कोल्हापूर : भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महिला पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मेहरोज के. पठाण यांनी दिलेल्या आदेशानुसार, पुढील सुनावणीपर्यंत अपर्णा जाधव यांना काही अटींसह अंतरिम संरक्षण देण्यात आले आहे. या प्रकरणातील सापळा कारवाई यशस्वी झाली नसल्याचा मुद्दा तसेच अर्जदार महिला असल्याची बाब न्यायालयाने विचारात घेतली.व या गुन्ह्यात अटक झाल्यास ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि त्याच रकमेच्या दोन सक्षम जामीनदारांवर त्यांची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने आदेशात दिले आहेत .अपर्णा जाधव यांनी दर शनिवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून तपासात सहकार्य करावे. तसेच पुराव्याशी छेडछाड करू नये किंवा साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या अटकपूर्व जामीन अर्जाची पुढील सुनावणी ३ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे.